कोरोची जलस्वराज्य पाणीपुरवठा प्रकल्पाचा हिशोब व दप्तर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सामाजिक लेखापरीक्षण अध्यक्षांची- माजी अध्यक्ष रमेश पाटील
कोरोची- उत्तम हुजरे
कोरोची येथील 'जलस्वराज' पाणीपुरवठा योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून गावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, गहाळ दप्तर जमा करणे बाबद ग्रामपंचायत यांनी काढलेल्या नोटीसावर पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. "मी पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष म्हणून लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली आहे. मात्र, योजनेचे दप्तर (रेकॉर्ड) सांभाळण्याची तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी माझी नसताना ग्रामपंचायतीने हे दप्तर माझ्याकडे मागितलेच कसे?" असा रोखठोक आणि कायदेशीर सवाल त्यांनी उपस्थित केला
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या दाव्यांमधील तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवले. कोणत्याही शासकीय योजनेत कामांची आणि जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी केलेली असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "नियम आणि पद्धतीनुसार योजनेचे दप्तर सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी माझी नसून, ती 'सामाजिक लेखा परीक्षण समिती' अध्यक्षांची आणि हेड क्लार्क ची असते. या सामाजिक लेखा समिती चे अध्यक्ष अभिनंदन पाटील होते व हेड क्लर्क मनोज कांबळे होते . त्यामुळे दप्तराच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी त्यांची व त्यांच्या समितीचीच आहे," असा दावा पाटील यांनी केला.
आपली कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर जबाबदारी नसतानाही ग्रामपंचायतीने केवळ आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे दप्तर मागितल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन मूळ नियमांकडे हेतुपरस्सर दुर्लक्ष करत असून, निव्वळ राजकीय हेतूने किंवा अज्ञानातून आपल्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सुप्त आरोपही त्यांनी यावेळी केला.
रमेश पाटील यांनी आपण अध्यक्ष असताना केलेल्या विकासकामांचा आणि लोकाभिमुख कार्याचा पाढा वाचला. ते म्हणाले, "माझे काम कागदपत्रांमध्ये अडकून पडण्याचे नव्हते, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांची तहान भागवण्याचे होते. गावात पाणी कुठे गेले, कुठे नाही, लोकांना ते वेळेत मिळते की नाही, हे पाहणे आणि नागरिकांचा फोन येताच प्रत्यक्ष जागेवर धावून जाऊन समस्येचे निवारण करणे ही माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती मी चोख पार पाडली आहे आणि गावाला एक दिवसा आड पाणी दिले आहे ."
रमेश पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चेंडू थेट 'सामाजिक लेखा परीक्षण समिती'चे अध्यक्ष अभिनंदन पाटील व हेड क्लर्क मनोज कांबळे आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कोर्टात टोलवला आहे. रमेश पाटील यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेनंतर आता ग्रामपंचायत प्रशासन किंवा अभिनंदन पाटील यावर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण कोरोची गावचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा